Thursday, January 11, 2018

शब्दबोध १


१) सचैल :- 
आंघोळीला इतका वेळ कसा लागला ग?काय अगदी फुरसतीत ;स्वच्छ,सचैल स्नान वगैरे केले की काय?' मंडळी,हे वाक्य बरेचदा आपल्याला अवतीभवती,घराघरात ऐकायला मिळते. कधी इतरांच्या संवादामधे तर कधी आपल्यासाठीही वापरल्या जाते.पण सर्वांच्या मनात 'सचैल' म्हणजे एकतर खुप आरामात केलेले स्नान किंवा अगदी स्वच्छ - म्हणजे अभ्यंगस्नानाच्या धरतीवरचे स्नान असाच अर्थ गृहीत धरलेला असतो.पण 'सचैल'या शब्दाचा हा अर्थ अजिबातच नाही.'चैल'म्हणजे वस्त्र.त्याला 'स'हा उपसर्ग (पूर्वप्रत्यय)लागला.
वस्त्रासह म्हणजे 'सचैल'.मग जेव्हा आपण 'सचैल स्नान'असा शब्दप्रयोग करतो त्याचा अर्थ होतो वस्त्रासहीत केलेले स्नान. खरेतर आपल्या शास्त्रांमध्ये स्नान हे वस्त्रासहीतच करावे असा नियमही सांगितलेला आहे.त्यावरूनच हा शब्द रूढ झाला.म्हणजे आता एखाद्या नदीवर,संगमावर अथवा समुद्रावर कोणी स्नान केले तर ते नक्कीच म्हणू शकतात'सचैल स्नान केले'.
२) कपोलकल्पित:-
हा शब्द काही आपल्याला अपरिचित नाही.साहित्यामधे तर वापरल्या जातोच पण आजकाल दैनंदिन बोलण्यातही किंवा वर्तमानपत्रांमधेही आपण ऐकतो अथवा वाचतो.'काय कपोलकल्पित कथा रंगवली त्याने!' किंवा 'उगाच कपोलकल्पित काहीही सांगू नकोस!'या वाक्यांवरून कपोलकल्पित म्हणजे केवळ कल्पनेमधले किंवा वेळेवर मनात काहीतरी रचून बोलणे असा अर्थ लावल्या जातो.
हिंदीत ज्याला आपण 'मनगढन्त'म्हणतो.पण मूळात हा शब्द कसा तयार झाला हे जाणून घेणे मोठे मजेशीर आहे.'कपोल'म्हणजे गाल आणि 'कपोळ'म्हणजे कपाळ अथवा गंडस्थळ (शब्दकोशात दोन्ही नोंदी आहेत)पण कालांतराने कपोल म्हणजे कपाळ असाच अर्थ गृहीत धरल्या जाऊ लागला.कपाळ हा डोक्याचा एक अवयव. ज्याचा मेंदूशी संबंध लावल्या जातो.विचार करणारा,एकाग्र होण्यास मदत करणारा एक अवयव.म्हणून मग डोक्याने विचार करून काहीतरी कल्पिलेले ते म्हणजे 'कपोलकल्पित 'असा सरळसरळ अर्थ रूढ झाला. मनातल्या मनात काहीतरी कल्पनापूर्ण रचलेले ते कपोलकल्पित. जे प्रत्यक्षात नाहीच,खरे ही नाही,केवळ कल्पनेमधले ते कपोलकल्पित.
३)बादरायणसंबंध :-
आपल्या अगदी रोजच्या बोलण्यात येणारा हा शब्द.'उगाच कशाचा कुठेही बादरायणसंबंध लावू नकोस हं!' असे किती सहजच आपण म्हणतो.आपल्या सर्वांना हे तर माहितच आहे की 'बादरायणसंबंध 'म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध. पण असा शब्दप्रयोग कुठून रूढ झाला हे मात्र माहित नसणार.तसे पाहिले तर 'बादरायण' हे कृष्णद्वैपायन व्यासांचे ,म्हणजेच महाभारताच्या मूळ कर्त्याचे नाव आहे.पण 'बादरायण संबंधात'त्यांचा संबंध नाही.'बादरायणसंबंध 'या शब्दप्रयोगाची कारणमीमांसा स्पष्ट करणारा एक श्लोक आहे.त्यावरून हा शब्दप्रयोग तयार झाला.बादरायण संबंधाचा श्लोक असा आहे.
युष्माकं बदरीवृक्षः अस्माकं बदरीचक्रम् |
बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयम्॥
या श्लोकाचा अर्थ असा आहे- बदरी म्हणजे बोर.बदरीवृक्ष म्हणजे बोराचे झाड.तुमच्या घरी बोरीचे झाड आहे आणि आमच्या रथाच्या चाकाचे लाकूड देखील बोरीचे आहे.तेव्हा तुमचा आणि आमचा 'बादरायणसंबंध 'तयार झाला.या संबंधामुळे तुम्ही,तुम्ही आहात आणि आम्ही,आम्ही आहोत.म्हणून 'बादरायणसंबंध 'म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध.
        तर मंडळी आजच्या तिनही शब्दांचे अर्थ -उगम बघता असे नक्कीच म्हणता येईल-' कृपया सचैल स्नानाचा कपोलकल्पित असा बादरायणसंबंध लावू नये!'
डाॅ. अमृता इंदूरकर
  नागपूर                          
चलभाष-९८८१३७७०८१ .

No comments:

Post a Comment