Saturday, February 3, 2018

शब्दबोध ४


गौडबंगाल
‘या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे’, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला कळत असते की, या प्रकरणात काहीतरी रहस्य आहे, पण ते नक्की काय हे माहिती नाही. मग हा शब्द आला कुठून?  गौड+बंगाल म्हणजे तरी काय? कारण ‘गौड’ हे बंगालचेच नाव आहे. मग अशी पुनरावृत्ती करणे म्हणजे, ‘मुलींची कन्याशाळा’ म्हणण्यासारखेच होईल ना. तर हे असे नाही. या ‘गौड’चा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे गूढ जाणणारा. त्यासोबतच मंत्रतंत्र, जादूटोणा, कूट रचना, चमत्कार, अद्भुत घटना असे अनेक अर्थ त्याला आहेत. मग त्याला बंगालशी का जोडले गेले आहे? तर बंगालमधील लोक जादू या कलेसाठी प्रसिद्घ होते. (जादूटोण्यासाठी असे म्हटलेले नाही.)विश्वविख्यात जादूगार सरकार हे बंगालीच आहेत. तर जादू ही काहीतरी भारावून टाकणारी, रहस्यमय कला आहे. खरेतर हे एक कलाकौशल्य आहे. तोच अर्थ या गौडबंगालला थोडय़ा नकारात्मक अर्थाने येऊन चिकटला म्हणूनच जे जे गूढ, रहस्यमय ते गौडबंगाल झाले.
झक मारणे
अकबर-बिरबलाच्या गोष्टी ज्यांनी लहानपणी वाचल्या असतील, त्यांना झक मारणे, या शब्दाचा अर्थ माहिती असू शकतो. एका गोष्टीत बिरबल अकबराला सांगतो, महाराज मी झक मारत बसलो होतो.
ती गोष्ट आता इथे सांगत नाही. ते पुढे येईलच पण ‘झक मारणे’ हा वाक्प्रचार आपण अनेक अर्थानी वापरतो.
उदा. ‘झक मारली आणि तिथे गेलो’ म्हणजे उगाचच गेलो. ‘अस्सं काही करेन ना मी की त्याला झक मारत यावे लागेल’ म्हणजे त्या माणसाचा नाइलाज होईल, त्याला ते करावेच लागेल अशा अर्थाचे काहीतरी. ‘काय झक मारत बसलाय, जरा, काम कर’ म्हणजे उगाच वेळ घालवत बसला आहेस. एकूणच या वाक्प्रचाराचा अर्थ उगाचच काहीतरी करत बसणे, वेळ वाया घालवणे, निरुपयोगी काही करत बसणे, महत्त्वाचे टाकून क्षुल्लक कामात अडकणे, असा काही होतो. पण मग अशा अर्थपूर्तीसाठी ‘झक’ हाच शब्द का तयार झाला असावा? तर ‘झक’ म्हणजे मासा. अशा या झक माशाला पकडण्यासाठी तासन्तास ताटकळत बसण्यावरून झक मारणे हा वाक्प्रचार तयार झाला. अत्यंत क्षुद्र कामासाठी वेळ दवडणे, निष्क्रिय बसणे यासाठी हा शब्द वापरल्या जाऊ  लागला. याच संदर्भात एक पुष्टी जोडता येईल. ‘झकवाद’देखील आहे. झकवाद म्हणजे शुष्कवाद, वितंडवाद घालणे, मिथ्या बोलणे, निरुपयोगी, अहितकारी, बिनकामाचे, फसवेगिरीचे भाषण करणे.
https://goo.gl/imnoPy
डॉ. अमृता इंदुरकर
दै लोकसत्ता
February 3, 2018 1:47 AM

Tuesday, January 30, 2018

शब्दबोध ३

शब्दबोध
१) उचलबांगडी 
मंडळी उचल+बांगडी यावरून खरच काय अर्थबोध होतो?उचल म्हणजे उचलणे हे तर लक्षात येते.पण नंतर 'बांगडी' आणि उचलण्याशी तिचा काय संबंध ?काही कळत नाही! 'उचलबांगडी '
या शब्दाचे दोन अर्थ संभवतात.उचलबांगडी म्हणजे हात -पाय धरून उचलून फेकून देणे.मनुष्याला जबरदस्तीने हटवायचे असले म्हणजे त्याचे हातपाय बांधूनच त्याला उचलण्यात येते.'पांगडी'म्हणजे माणसाला हात-पाय बांधून पांगळे करण्याची स्थिती. त्यावरून तयार झाला 'उचलपांगडी' ; म्हणजे त्याची पांगडी करून त्याला उचलणे.पुढे वहिवाटीत 'प' चा 'ब' झाला आणि पांगडीचे बांगडी झाले. दुसरा अर्थ असा संभवतो की, 'पांगडी 'म्हणजे मासे धरण्याचे मोठे जाळे.ते नदीमध्ये फेकल्यानंतर त्यात मासे अडकले तर कोळी लोक त्याची टोके पकडून ताकदीने ते बाहेर काढतात;आणि एकदम किनाऱ्यावर फेकून देतात.अशा रितीने एकदम उचलून फेकून देणे या अर्थाने 'उचलपांगडी' झाले.इथेही कालांतराने 'प' चा 'ब' झाला त्यामुळे उचलबांगडी हा शब्द रूढ झाला.
२) कुलावतंस
राजे,महाराजे यांच्या काळात छत्रपती ,सम्राट यांच्या दरबारातील आगमनाच्या वेळी ' क्षत्रिय कुलावतंस ,राजाधिराज छत्रपती श्री........' अशी घोषणा केली जात असे.कुल+अवतंस असा मिळून शब्द तयार झाला 'कुलावतंस'. 'अवतंस' म्हणजे पुष्पे,रत्ने घालून केलेले शिरोभूषण,मुकुट.असे हे शिरोभूषण म्हणजे मुकुट धारण करणारा कोण तर कुळप्रमुख (अर्थात त्याकाळात राजा,छत्रपती  याअर्थी).म्हणजेच जो कुळासाठी भुषणावह ठरलेला ,कुळाला व आपल्या शिरोभूषणाला स्वकर्तृत्त्वाने शोभिवंत करणारा तो 'कुलावतंस '.यामधे अतिशय महत्त्वाचे म्हणजे कुलावतंस मधे अनुस्वार 'त' वर आहे 'व' वर नाही.
डाॅ. अमृता इंदूरकर
नागपूर.

Wednesday, January 17, 2018

शब्दबोध २

शब्दबोध
) वडवानल
'वडवा'म्हणजे घोडी.शिवाय 'वडवा'म्हणजे वणवा देखील; असे दोन्ही अर्थ आहेत. 'अनल' म्हणजे अग्नी.घोडीच्या तोंडासारखे तोंड असलेला अग्नी समुद्रामधे वसत असतो.म्हणून त्याला वडवानल असे म्हणतात.तर 'दावानल' म्हणजे अरण्यातील अग्नी अथवा वणवा.'वडवानल'म्हणजे समुद्रातील अग्नी. या वडवानलासंबंधी एक आख्यायिका आहे.असे म्हणतात समुद्रामधे हा अग्नी असल्यामुळेच,समुद्र आपली मर्यादा सोडत नाही.आपण बघतो समुद्राला भरती येते पण कितीही पाऊस पडला तरी समुद्राला पूर येत नाही.जास्तीचे सर्व पाणी हा 'वडवानल'पिऊन टाकतो आणि समुद्राला मर्यादेबाहेर जाऊ देत नाही.असा हा 'वडवानल '.
२)अजागळ
'कसा अजागळ दिसत होता ग तो' किंवा 'त्यादिवशी कशी अजागळासारखी आली होती ती!' याही उपर 'असा अजागळासारखा का वागतो आहेस?' असे वाक्य आपण कधी ना कधी कोणाला ना कोणाला नक्कीच म्हटले असणार.पण 'अजागळ 'म्हणजे नक्की काय?हा शब्द कसा तयार झाला असणार व त्याचा अर्थ तरी काय?'अज' म्हणजे बोकड/ शेळी.'गळ' म्हणजे गळा.खरे म्हणजे 'अजागलस्तन' असा पूर्ण शब्द हवा.बोकडाच्या गळ्याजवळील मांसल भागाला अजागलस्तन म्हणतात.तो भाग जसा निरुपद्रवी,तसाच अनुपयोगीही असतो.स्तन असूनही दूध देणारा नसतो.पुढे उच्चारसुलभतेच्या गरजेतुन 'स्तन'गळून पडला आणि 'अजागल' उरला;त्याचे पुढे अजागळ झाले.अजागळ म्हणजे निरुपयोगी,निरर्थक,दिसायला विचित्र असा ;असे अर्थ आहेत.मराठीत बोलताना मात्र त्यावरून 'बावळट','मूर्ख' वागणारा किंवा काहीतरी बेंगरूळ ,ओंगळवाणा वेश परिधान केलेल्याला देखील अजागळ म्हणण्यात येते.म्हणजे अजागळ वागणारा आणि अजागळ दिसणारा असे दोन्ही अर्थ यामधे सामावलेले आहेत.
डाॅ. अमृता इंदूरकर
    नागपूर
चलभाष-९८८१३७७०८

Thursday, January 11, 2018

शब्दबोध १


१) सचैल :- 
आंघोळीला इतका वेळ कसा लागला ग?काय अगदी फुरसतीत ;स्वच्छ,सचैल स्नान वगैरे केले की काय?' मंडळी,हे वाक्य बरेचदा आपल्याला अवतीभवती,घराघरात ऐकायला मिळते. कधी इतरांच्या संवादामधे तर कधी आपल्यासाठीही वापरल्या जाते.पण सर्वांच्या मनात 'सचैल' म्हणजे एकतर खुप आरामात केलेले स्नान किंवा अगदी स्वच्छ - म्हणजे अभ्यंगस्नानाच्या धरतीवरचे स्नान असाच अर्थ गृहीत धरलेला असतो.पण 'सचैल'या शब्दाचा हा अर्थ अजिबातच नाही.'चैल'म्हणजे वस्त्र.त्याला 'स'हा उपसर्ग (पूर्वप्रत्यय)लागला.
वस्त्रासह म्हणजे 'सचैल'.मग जेव्हा आपण 'सचैल स्नान'असा शब्दप्रयोग करतो त्याचा अर्थ होतो वस्त्रासहीत केलेले स्नान. खरेतर आपल्या शास्त्रांमध्ये स्नान हे वस्त्रासहीतच करावे असा नियमही सांगितलेला आहे.त्यावरूनच हा शब्द रूढ झाला.म्हणजे आता एखाद्या नदीवर,संगमावर अथवा समुद्रावर कोणी स्नान केले तर ते नक्कीच म्हणू शकतात'सचैल स्नान केले'.
२) कपोलकल्पित:-
हा शब्द काही आपल्याला अपरिचित नाही.साहित्यामधे तर वापरल्या जातोच पण आजकाल दैनंदिन बोलण्यातही किंवा वर्तमानपत्रांमधेही आपण ऐकतो अथवा वाचतो.'काय कपोलकल्पित कथा रंगवली त्याने!' किंवा 'उगाच कपोलकल्पित काहीही सांगू नकोस!'या वाक्यांवरून कपोलकल्पित म्हणजे केवळ कल्पनेमधले किंवा वेळेवर मनात काहीतरी रचून बोलणे असा अर्थ लावल्या जातो.
हिंदीत ज्याला आपण 'मनगढन्त'म्हणतो.पण मूळात हा शब्द कसा तयार झाला हे जाणून घेणे मोठे मजेशीर आहे.'कपोल'म्हणजे गाल आणि 'कपोळ'म्हणजे कपाळ अथवा गंडस्थळ (शब्दकोशात दोन्ही नोंदी आहेत)पण कालांतराने कपोल म्हणजे कपाळ असाच अर्थ गृहीत धरल्या जाऊ लागला.कपाळ हा डोक्याचा एक अवयव. ज्याचा मेंदूशी संबंध लावल्या जातो.विचार करणारा,एकाग्र होण्यास मदत करणारा एक अवयव.म्हणून मग डोक्याने विचार करून काहीतरी कल्पिलेले ते म्हणजे 'कपोलकल्पित 'असा सरळसरळ अर्थ रूढ झाला. मनातल्या मनात काहीतरी कल्पनापूर्ण रचलेले ते कपोलकल्पित. जे प्रत्यक्षात नाहीच,खरे ही नाही,केवळ कल्पनेमधले ते कपोलकल्पित.
३)बादरायणसंबंध :-
आपल्या अगदी रोजच्या बोलण्यात येणारा हा शब्द.'उगाच कशाचा कुठेही बादरायणसंबंध लावू नकोस हं!' असे किती सहजच आपण म्हणतो.आपल्या सर्वांना हे तर माहितच आहे की 'बादरायणसंबंध 'म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध. पण असा शब्दप्रयोग कुठून रूढ झाला हे मात्र माहित नसणार.तसे पाहिले तर 'बादरायण' हे कृष्णद्वैपायन व्यासांचे ,म्हणजेच महाभारताच्या मूळ कर्त्याचे नाव आहे.पण 'बादरायण संबंधात'त्यांचा संबंध नाही.'बादरायणसंबंध 'या शब्दप्रयोगाची कारणमीमांसा स्पष्ट करणारा एक श्लोक आहे.त्यावरून हा शब्दप्रयोग तयार झाला.बादरायण संबंधाचा श्लोक असा आहे.
युष्माकं बदरीवृक्षः अस्माकं बदरीचक्रम् |
बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयम्॥
या श्लोकाचा अर्थ असा आहे- बदरी म्हणजे बोर.बदरीवृक्ष म्हणजे बोराचे झाड.तुमच्या घरी बोरीचे झाड आहे आणि आमच्या रथाच्या चाकाचे लाकूड देखील बोरीचे आहे.तेव्हा तुमचा आणि आमचा 'बादरायणसंबंध 'तयार झाला.या संबंधामुळे तुम्ही,तुम्ही आहात आणि आम्ही,आम्ही आहोत.म्हणून 'बादरायणसंबंध 'म्हणजे ओढून ताणून लावलेला संबंध.
        तर मंडळी आजच्या तिनही शब्दांचे अर्थ -उगम बघता असे नक्कीच म्हणता येईल-' कृपया सचैल स्नानाचा कपोलकल्पित असा बादरायणसंबंध लावू नये!'
डाॅ. अमृता इंदूरकर
  नागपूर                          
चलभाष-९८८१३७७०८१ .